पुणे । पुण्यातील रेव्ह पार्टीवर पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टाकलेल्या धाडीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली आहे.
आज त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपत असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सुनावणीच्या अगोदर एकनाथ खडसे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक धक्कादाक आरोप केले आहेत. पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्या घरात पत्रकार असल्याचे भासवत तीन पोलीस अधिकारी आतमध्ये आले होते, असा खळबळजनक आरोप खडसेंनी केला आहे.
तसेच पोलिसांना खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल देखील एकनाथ खडसे यांनी पोलिसांना विचारला. एकनाथ खडसे यांच्या आरोपानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी उत्तर दिलं.
एकनाथ खडसे यांच्या कारवाईवर पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, ‘जी कारवाई झाली, त्याची विस्तृत माहिती दिली आहे. पारदर्शरक आणि कायदेशीर कारवाई होईल. कोणीही पोलिस दलावर शंका ठेवायची गरज नाही. कोणत्याही प्रकाराचा फोटो आणि व्हिडिओ पोलिसांकडून लीक झालेला नाही’.
‘पोलिस ठाण्याच्या आतमध्ये देखील रेकॉर्डिंगवर बंदी घालता येत नाही. आम्ही काही लीक करत नाही, जे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतील, त्याला थांबवू शकत नाही. कोणताही व्हिडिओ पोलिसांकडून लीक झालेला नाही, असे स्पष्टीकरण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलं.
Discussion about this post