मुंबई । काँगेस नेते राहुल गांधी यांनी OBC समाजाच्या हक्कांसाठी पुरेसे प्रयत्न न झाल्याची कबुली देत, ही चूक सुधारण्याचा संकल्प व्यक्त केला होता. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जातनिहाय जनगणनेवरून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ॲड. आंबेडकर म्हणाले की, राहुल गांधी हा मोठेपणाचा देखावा थांबवा. तुम्ही म्हणता की जातीनिहाय जनगणना न झाल्याची चूक केवळ तुमची आहे. त्यामुळे ओबीसींना त्यांचा हक्क मिळाला नाही. राहुल गांधी, सर्वप्रथम हे समजून घ्या की ही चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला एक गुन्हा आहे. हा गुन्हा तुमच्या आजी इंदिरा गांधी, तुमचे वडील राजीव गांधी, तुमची आई सोनिया गांधी, तुम्ही स्वतः आणि तुमची काँग्रेस पार्टी या सगळ्यांनी मिळून दशकानुदशके बहुजनांवर केला आहे.’
इंदिरा गांधींनी मंडल आयोगाचा अहवाल १० वर्षे दाबून ठेवला
प्रकाश आंबेडकर यांनी पुढे म्हटलं की, ‘तुमच्या आजी इंदिरा गांधी यांनी मंडल आयोगाचा अहवाल १० वर्षे दाबून ठेवला. तुमचे वडील राजीव गांधी मंडल आयोग लागू करण्यास आणि ओबीसींना आरक्षण देण्यास विरोधात होते. याचे पुरावे त्यांच्या लोकसभेत दिलेल्या भाषणांमध्ये सापडतात. माझे मित्र आणि तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग, माझे सहकारी आणि मी मिळून मंडल आयोगाच्या शिफारसी आणि ओबीसींसाठी २७% आरक्षण लागू केलं.’
“तुमची आई सोनिया गांधी, ज्या यूपीए आघाडीच्या अध्यक्षा होत्या, त्यांनी यूपीए सरकारमध्ये जातीय जनगणनेचा मुद्दा दाबून ठेवला. २०११ मध्ये समाजवादी पक्षांनी जनगणनेत जात नोंदवण्याची मागणी केली, तेव्हा तुमची काँग्रेस पार्टी आणि तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या मागणीचा विरोध केला. जातीय जनगणनेची मागणी वाढल्यावर शेवटी हार मानून तुमच्या पक्षाने जनगणना केली, पण आजपर्यंत त्या जनगणनेचे आकडे तुम्ही जाहीर केलेले नाहीत,” याची आठवण प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना करून दिली आहे.
Discussion about this post