जळगाव । पुण्यातील खराडी येथील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीत अमली पदार्थ व दारू सापडल्याने पोलिसांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली. या कारवाईने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून यावर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, याप्रकरणात पोलिस तपास करत आहे. त्यामुळे याविषयीची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण जी माहिती हाती आली आहे, त्यानुसार, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे या पार्टीत होते. त्यांचा समावेशच नव्हता तर त्यांनी ही पार्टी आयोजित केली होती, असा आरोप महाजन यांनी केला.
कुटुंबातील सदस्याला अडकवण्यात येईल असे आपल्याला पूर्वीपासून वाटतं होते. अशा घटनेची पूर्वकल्पना होती, अशी प्रतिक्रिया नाथाभाऊंनी दिल्याचे माध्यम प्रतिनिधींनी महाजन यांना सांगितले. त्यावर महाजनांनी ‘मग त्यांनी जावयाला अलर्ट करायला हवं होतं, हा तपासाचा भाग आहे. प्रत्येक वेळीच षडयंत्र कसे असेल, असा सवाल महाजन यांनी केला. 7-8 जणांचे मोबाईल तपासल्यावर समोर येईल. त्यांच्या जावयांना कोणी कडेवर घेतलं आणि तिथे नेऊन ठेवलं, असं तर झालं नाही ना? चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कारवाई झाली पाहिजे,’ असा चिमटा महाजनांनी काढला.
Discussion about this post