जळगाव । जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैधपणे जुगार अड्डा चालविला जात आहे. अशातच चोरीछुपे खेळल्या जाणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून लाखो रुपयाची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई आव्हाणा शिवारातील हरिकृष्ण नगरात झाली. यात तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हरिकृष्ण नगरात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक श्यामकांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार रामकृष्ण इंगळे, धनराज पाटील, दीपक चौधरी, पोलीस नाईक नरेंद्र पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक पाटील, तुषार जोशी आणि ज्योती साळुंखे यांच्या पथकाने हरिकृष्ण नगरात जाऊन छापा टाकला.
या छाप्यात जुगार खेळणाऱ्याजितेंद्र रामचंद कदम (रा. हरिकृष्ण नगर), संजय जनार्दन सपकाळे (५०, रा. शिवाजीनगर) आणि मयूर कैलास भावसार (३२, रा. इंद्रप्रस्थ नगर) यांना रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी रोख २ लाख १४ हजार ५० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. आरोपींविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
Discussion about this post