जळगाव शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिथे देहविक्रीचा गोरखधंदा उघडकीस आला असून, या कारवाईत बांगलादेशातील एका तरुणीची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यात पुन्हा एकदा महिला तस्करी आणि देहविक्रीच्या प्रकरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पुण्यातील एका सामाजिक संस्थेच्या महिलांनी २४ जुलै रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन, एका बांगलादेशी तरुणीला डांबून ठेवत तिच्याकडून जबरदस्तीने देहविक्री करवून घेतली जात असल्याची माहिती दिली. माहितीची गंभीर दखल घेत डॉ. रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हापेठ पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
सायंकाळी प्रोफेसर कॉलनीतील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी बांगलादेशी तरुणीची सुटका केली. तिच्याकडे बांगलादेशातील ओळखपत्रही सापडले. तरुणीला तत्काळ महिला सुधारगृहात हलवण्यात आले असून, या प्रकरणी एका महिलेविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या महिलेविरुद्ध यापूर्वीही अशाच स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी एमआयडीसीतील एका हॉटेलमध्येही अशाच प्रकारे दुसरी बांगलादेशी तरुणी आढळून आली होती. त्यामुळे जळगावमधील वाढत्या देहविक्री व्यवहारांबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिस आता या तरुणीला भारतात कशा पद्धतीने आणले गेले, तिची बनावट ओळख कशी तयार झाली, आणि तिला या व्यवसायात ढकलणाऱ्या टोळीचा शोध घेत आहेत. प्रोफेसर कॉलनीतील घरात गुप्तपणे हा व्यवसाय सुरू होता. स्थानिक पोलिस यंत्रणेला याबाबत काहीही माहिती न मिळाल्याने त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Discussion about this post