चाळीसगाव । धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कन्नड घाटात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी एका मोटारीतून तब्बल ३९ किलो अँफेटामाइन अंमली पदार्थाचा साठा जप्त केला. ज्याची किंमत जवळपास ६० कोटी रुपये असल्याचं समोर आले असून या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून राज्य आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून याकडे अत्यंत गंभीर प्रकरण म्हणून पाहिले जात आहे.
याबाबत असं की, चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील कन्नड घाटाजवळ महामार्ग पोलिस मदत केंद्रासमोर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नाकाबंदीदरम्यान चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी दिल्लीहून बंगळुरूकडे जाणाऱ्या डी.एल.बी.बी.७७७१ या कारमधून जाणारा ३९ किलो अँफेटामाईनचा साठा जप्त केला.
जो ४० ते ६० काेटींचा साठा असल्याची माहिती उपनिरीक्षक शशिकांत पाटील यांनी दिली. कारमधील सीटवर दाेन ते तीन बॅगमध्ये हे अँफेटामाइन ठेवलेले हाेते. याप्रकरणी दिल्ली येथील सय्यद नामक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. चालकाकडे या प्रकरणाची चौकशी केली जात असून त्याच्या माध्यमातून मालकाचे नाव पुढे येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान अँफेटामाईन हा पदार्थ प्रामुख्याने विदेशातून तस्करी करून भारतात आणला जातो आणि देशातील तरुण पिढीला व्यसनाधीन करण्यासाठी वापरला जातो, अशी माहितीही उघड झाली आहे. या संपूर्ण कारवाईची गांभीर्याने दखल घेत राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे.ड्रग्जमुक्त महाराष्ट्र या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पाला बळ देणारी ही महत्त्वपूर्ण कारवाई ठरत असून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हावासीयांतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जाईल, तसतसे आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Discussion about this post