जळगाव । सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या आत्महत्येमुळे सरकारवर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान हर्षल पाटील यांच्या आत्महत्येवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलीही काम नाहीत तसच त्या योजनेवर कुठलीही बिलं प्रलंबित नाहीत. सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी काम घेतलेली असावीत. मात्र त्याची जिल्हा परिषदेकडे नोंद नाही” असं स्पष्टीकरण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपावर गुलाबराव पाटील म्हणाले की, “ही स्थिती फक्त महाराष्ट्र राज्याची नाही तर संपूर्ण देशाची आहे. 3800 कोटींचा प्रस्ताव आम्ही अर्थ व वित्त खात्याकडे दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. ते काम करणार आहेत पण काही गोष्टीला थोडा उशीर लागतो. त्यामुळे थांबावं लागतं” “आतापर्यंतच्या कामाचे पैसे दिले आणि पुढच्या कामाचे पैसे मिळणार नाही असं होणार नाही. सरकार आहे, थोड्या गोष्टी मागे पुढे होत असतात. मात्र याचा बवाल करू नये एवढीच आमची विनंती आहे” असं गुलाबराव पाटील म्हणाले.
Discussion about this post