मुंबई । राज्यात गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रॅपची चांगलीच चर्चा सुरू आहे. याच दरम्यान शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी हनीट्रॅप प्रकरणात भाजपवर गंभीर आरोप करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गिरीश महाजन आणि हनी ट्रॅप प्रकरणात अटक केलेल्या प्रफुल्ल लोढा याचा फोटो शेअर करत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विधानसभेत दिशाभूल केल्याचा आरोप करत, महाराष्ट्रात ‘हनी ट्रॅप’चे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा दावा केला आहे. संजय राऊत यांनी लोढा आणि गिरीश महाजन यांच्या फोटोग्राफची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
राऊत यांनी दावा केला की, 4 मंत्र्यांचा या हनीट्रॅप प्रकरणात सहभाग आहे आणि याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आहे. त्यांनी असा आरोपही केला की, याच प्रकरणाशी संबंधित पेन ड्राइव्ह शोधण्यासाठी पोलिसांनी पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. याशिवाय, राऊत यांनी प्रफुल्ल लोढा यांच्यासोबत फडणवीस यांचा फोटो दाखवत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
मुख्य मंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात,
महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले:
या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊद्या!
दुध का दूध पानी का पानी होईल!
४ मंत्री
अनेक अधिकारी अडकले आहेत!
शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार (तेंव्हा )याच ट्रॅप मुळे पळाले .
pic.twitter.com/DduL723OOw— Sanjay Raut (@rautsanjay61) July 21, 2025
राऊत यांनी पुढे दावा केला की, याच हनीट्रॅपच्या माध्यमातून महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकार 2022 मध्ये पाडले गेले. यापूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही असाच दावा केला होता, परंतु राऊत यांनी सर्व माहिती आणि पुरावे आपल्याकडे असल्याचे ठामपणे सांगितले. त्यांनी असा खळबळजनक आरोपही केला की, शिवसेनेचे चार तरुण खासदार हनीट्रॅपमुळे आणि काहीजण सीबीआय, ईडी यासारख्या तपास यंत्रणांच्या दबावामुळे तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे शिंदे गटाकडे गेले. राऊत यांनी म्हटले की, आमचे नेते हनीट्रॅपमुळे सुरतमार्गे गुवाहाटीला गेले. या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
Discussion about this post