मुंबई । हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाबाबत चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरे यांनी मिरारोडमधील सभेतून निशिकांत दुबे यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. ‘दुबे तू आम्हाला पटक पटक के मारणार.. दुबेलाच सांगतो.. दुबे, तू मुंबईत ये…मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे,असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबेंना खुलं आव्हान दिलं आहे.
काय म्हणाले होते दुबे?
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली होती. मराठी माणसाला आम्ही पोसतोय? अशी दर्पोक्तिही दुबे यांनी केली होती. त्यानंतर दुबे यांना थेट चॅलेंज दिलं आहे. राज ठाकरे यांनी निशिकांत दुबे यांना मुंबईत येण्याचं आव्हान केलं. दुबे तू मुंबईत येऊन दाखव? मुंबईच्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी दुबेंवर हल्लाबोल केला आहे.
तसेच राज ठाकरेंनी म्हटलं, माझं सर्व भाषांवर प्रेम आहे. माझा दावा कदाचित चुकीचा नसावा. पण महाराष्ट्रात जेवढे नेते आहेत त्यांच्या सर्वांपेक्षा माझी हिंदी बरी आहे. याचे कारण म्हणजे माझे वडील… माझ्या वडिलांना व्याकरणासह उत्तम मराठी, उत्तम इंग्रजी येत होतं, उत्तम उर्दू येत होतं. भाषा कोणतीही वाईट नसते. कधीच वाईट नसते. हिंदी वाईट भाषा नव्हे… पण आमच्यावर लादणार असाल तर नाही बोलणार जा…
हिंमत असेल तर….
राज ठाकरेंनी पुढे म्हटलं, मी माझ्या पत्रात सुद्धा म्हटलं होतं, आम्ही हिंदू आहोत हिंदी नव्हे. पण हिंदुत्वाच्या बुरख्याखालून तुम्ही माझी मराठी संपवायला येणार असाल तर माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार पण नाही. हिंमत असेल तर तुम्ही हात लावून दाखवा.
Discussion about this post