जळगाव । जर तुम्ही रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करत असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे. रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक व्हावा म्हणून रेल्वे प्रशासनाकडून बेडशीट, उशी व ब्लॅकेट दिले जाते.
मात्र, या वस्तू केवळ प्रवासादरम्यान वापरण्यासाठीच असतात; परंतु काही लोक या वस्तू घरी नेतात. हा चोरीचा प्रकार असून, दोषींवर रेल्वेकडून कडक कारवाई केली जाणार आहे. यानुसार दोषी व्यक्तीस तुरुंगवास होऊ शकतो.
रेल्वेचा नियम काय?
रेल्वे कायदा १९६६ च्या कलम ३ अंतर्गत, ‘कोणत्याही रेल्वे मालमत्तेची चोरी, नुकसान किंवा गैरवापर हा गंभीर गुन्हा मानला जातो. पहिल्यांदा दोषी आढळणाऱ्या प्रवाशास एक वर्षापर्यंत तुरुंगवास, १,००० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. यापुढे वारंवार गुन्हा केल्यास शिक्षा अधिक कठोर होते. यानुसार ५ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. रेल्वे संरक्षण दल ही बाब गांभीर्याने पाहत आहे.
रेल्वेने प्रवास करताना या गोष्टी कधीच नेऊ नये
रेल्वेने प्रवास करताना काही गोष्टी कधीच घ्यायच्या नसतात. यामध्ये ज्वलनशील पदार्थ, स्फोटक वस्तू, अॅसिड, विषारी पदार्थ, शस्त्रे, दारु अशा वस्तू घेऊन जाऊ नये.तसेच परवानगीपेक्षा जास्त समान घेऊन जाणेही चुकीचे आहे. मिडिया रिपोर्टनुसार, सुकलेले नारळदेखील घेऊन जाण्यास मनाऊ आहे. कारण हे ज्वलनशील आहे. त्यामुळे रेल्वेच्या या सर्व नियमांचे पालन करा. जर तुम्ही नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला दंड होऊ शकतो.
Discussion about this post