नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात वारा आणि पाऊस होत आहे. याच दरम्यान एक दुर्दैवी घटना समोर आलीय. वैद्यकीय उपचारासाठी आईला नंदुरबार येथे नेत असताना चालत्या दुचाकीवर झाड कोसळून आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना खांडबारा-नंदुरबार मार्गावर असलेल्या बालअमराई येथे घडली. नवापूर तालुक्यातील वासदा येथील रहिवासी दीपा दाविद गावित (वय ४५) आणि दिशांतकुमार दाविद गावित (वय २५) अशी मृत आई व मुलाची नावे आहेत.
आईला वैद्यकीय उपचारासाठी दिशांत हा दुचाकीने वासदा येथून नंदुरबारकडे निघाला. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारा सुरु झाला. बालअमराईजवळ एका बाभळीच्या झाडाची फांदी त्यांच्या दुचाकीवर कोसळली. त्यात दोघेही अडकले.
स्थानिक नागरीकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दीपा गावित यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी दिशांतकुमारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दीपा यांचे पती साक्री पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. एक मुलगी कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.
Discussion about this post