नवी दिल्ली । शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या प्रकरणाची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या सुनावणीवेळी रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली, शिंदे गटाकडून मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या प्रकरणाची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातील सुनावणीची तारीख मागितली. त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आपले वेळापत्रक तपासून तारीख कळवणार असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी होणार असल्याने ऑगस्टमध्येच सुनावणी होऊन निकाल यावा अशी उद्धव ठाकरे गटाची इच्छा आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयात ऑगस्टमध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत मुख्य सुनावणी पूर्ण होईपर्यंत महानगरपालिका निवडणुका आल्यास हा सर्वोच्च न्यायालय हा निकाल राखून ठेवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित असून आता याचा सोक्षमोक्ष लावायचा असल्याचे संकेत आज झालेल्या सुनावणीत दिले. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार की उद्धव ठाकरे यांना परत मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टमध्येच निकाल जाहीर केला तर याचा परिणाम निवडणुकांवर होऊ शकतो. परंतु निकाल राखून ठेवला तर तो निवडणुका संपल्यानंतर म्हणजेच 2025 वर्ष संपण्यापूर्वी अंतिम निकाल दिला जाऊ शकतो, असेही सांगितले जात आहे. ऑगस्टमधील अंतिम सुनावणीची तारीख दोन ते तीन दिवसांत निश्चित केली जाणार आहे.
Discussion about this post