प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने नियोजित करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या तयारीच्या आणि आरक्षण चार्टच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय वेस्टर्न रेल्वेने घेतला आहे. रेल्वेचे तिकिट आरक्षित केलेल्या प्रवाशांचे नाव, कोच क्रमांक आणि बर्थची माहिती असलेले आरक्षण चार्ट तयार केले जातात. स्थानक किंवा दूरच्या स्थानकातून ट्रेन सुटण्याच्या ४ तास आधी ही यादी प्रसिद्ध केली जाते. पण आता हा चार्ट ८ तास आधी जारी केला जाईल. १४ जुलैपासून याची अंमलबजावणी केली जाईल, असे वेस्टर्न रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, सकाळी 05:01 ते दुपारी 2:00 या वेळेत निघणाऱ्या गाड्यांचा पहिला आरक्षण चार्ट आता आदल्या दिवशीच्या रात्री 9:00 वाजता तयार केला जाईल. दुपारी 2:01 ते 4:00 या वेळेत निघणाऱ्या गाड्यांचा पहिला आरक्षण तक्ता त्या दिवशी सकाळी 7:30 वाजता तयार होईल. सायंकाळी 4:01 ते रात्री 11:59 आणि मध्यरात्री 00:00 ते सकाळी 05:00 या वेळेत निघणाऱ्या गाड्यांचा पहिला आरक्षण तक्ता नियोजित प्रस्थान वेळेच्या आठ तास आधी तयार जाहीर केला जाईल.
रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दुसऱ्या आरक्षण तक्त्याच्या नियमांमध्ये कोणताही बदल होणार नाही. ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या ३० मिनिटे आधीच अंतिम आरक्षण चार्ट तयार केला जाईल. प्रवासी अंतिम यादी तयार होईपर्यंत रिक्त बर्थसाठी आरक्षण करू शकतील. हा निर्णय प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करता यावे आणि शेवटच्या क्षणी गोंधळ व गर्दी टाळता यावी या उद्देशाने घेतला आहे.
Discussion about this post