अमरावती : मागच्या आजच्या काही काळात राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचं दिसून येत आहे. निसर्गाचा लहरीपणा, कधी अस्मानी संकटामुळे, तर कधी कर्जबाजारीसह अनेक संकटामुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याचं दिसत आहे. दरम्यान पश्चिम विदर्भात दर आठ तासाला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. अशा प्रकारे मागील सहा महिन्यात तब्बल ५२७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
पश्चिम विदर्भात म्हणजेच अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि आकोला या पाच जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढतेच आहे. यंदा सहा महिन्यात म्हणजेच जून अखेर ५२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात १७८ आत्महत्या आहे. दर आठ तासात एक शेतकरी मृत्यूचा फास आवळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी बेजार
नैसर्गिक आपत्ती, नापिकी, दुष्काळ, बँकांचे व सावकारांचे कर्ज, कर्ज वसुलीचा तगादा, मुलींचे लग्न, आजारपण यासह अनेक कारणांमुळे पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे वास्तव आहे. यावर मात करण्यासाठी शासन- प्रशासन गंभीर नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या वाढलेल्या आहेत. अमरावती विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार जानेवारी ते जून २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधित तब्बल ५२७ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
Discussion about this post