जळगाव : मध्य रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई धुळे एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात काहीसा बदल केला आहे. ही गाडी 15 जुलैपासून धुळे स्थानकावर अर्धा तास लवकर दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने विशेषतः चाळीसगाव ते धुळेदरम्यानच्या सर्व स्थानकांसाठी सुधारित वेळापत्रक प्रकाशित केले आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या धुळे परिसरातील प्रवाशांची स्वतंत्र रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रशासनाने प्रारंभी धुळे ते दादरदरम्यान त्रैसाप्ताहिक रेल्वे सेवा सुरु केली. प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद पाहून काही कालावधीतच ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत वाढवण्यात आली.
सध्या गेल्या दोन वर्षांपासून नियमितपणे धावणारी ही गाडी (11011) दररोज दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटते आणि त्याच दिवशी रात्री 8.55 वाजता धुळे स्थानकात पोहोचते. तसेच, धुळे येथून मुंबईकडे धावणारी (11012) गाडी दररोज सकाळी 6.30 वाजता धुळे स्थानकावरून सुटते आणि दुपारी 2.15 वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचते. या दोन्ही गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, जामदा आणि शिरूड या स्थानकांवर दोन्ही दिशांनी थांबा देण्यात आले आहेत.
दरम्यान, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून धुळ्याकडे दुपारी 12 वाजता निघणाऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकात 15 जुलैपासून काही बदल करण्यात आले आहेत. ही गाडी पूर्वीप्रमाणेच मुंबईहून ठरलेल्या वेळेसच रवाना होईल, मात्र नव्या वेळापत्रकानुसार चाळीसगाव स्थानकावर ती आता 15 मिनिटे लवकर म्हणजेच रात्री 7.10 ऐवजी 6.55 वाजता दाखल होणार आहे.
केवळ 20 किमी अंतरासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला हेलिकॉप्टरचा आधार, मनसेचे नेते राजू पाटील यांचा आरोप
त्याचप्रमाणे, जामदा स्थानकावर रात्री 7.30 ऐवजी 7.15 वाजता, तर शिरूड स्थानकावर 8.06 ऐवजी 7.44 वाजता पोहोचेल. अंतिम थांबा असलेल्या धुळे स्थानकावरही आता ही गाडी रात्री 8.55 ऐवजी 8.25 वाजता पोहोचणार आहे. सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन आपल्या प्रवासाची योजना आखावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.
Discussion about this post