लातूर । महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात एका वृद्ध दांपत्य स्वत:ला औताला जुंपून शेतीची कामं करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हडोळती गावच्या वृद्ध दाम्पत्याचा हा व्हिडीओ आहे. संबंधित शेतकऱ्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून नांगरणीसाठी त्यांच्याकडे बैलसुद्धा नाही. अशा परिस्थितीतही हार न मानता हा वृद्ध शेतकरी स्वत:ला औताला जुंपला आहे. शेतकरी दाम्पत्याचं हे कष्ट पाहून अखेर अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे.
त्याने थेट प्रतिक्रिया देत लिहिले की “तुम्ही नंबर पाठवा, मी बैल पाठवतो”. तर लातूर तालुक्याचे कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी संबंधित शेतकऱ्याविषयीची माहिती दिली आहे. “त्यांचं नाव अंबादास पवार असून त्यांची 4 बिघा जमीन आहे. ही जमीन सिंचनासाठी पावसावर अवलंबून आहे. आमच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने भेट दिली आणि त्यांना तिथे शेतीसाठी आवश्यक उपकरणांची कमतरता आढळली. म्हणून आम्ही त्यांना कृषी विभागात अनुदानित दरात उपलब्ध असलेल्या सर्व उपकरणांबद्दल सांगितलं”, असं ते म्हणाले.
संबंधित शेतकऱ्याकडे कृषी ओळखपत्र नव्हतं. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी ओळखपत्र बनवण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याचप्रमाणे लवकरच त्यांना कृषी विभागाकडून ट्रॅक्टर आणि 1.25 लाख रुपये यांसह सर्व उपकरणे मिळतील, अशीही माहिती बावगे यांनी दिली.
Discussion about this post