जळगाव । जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढताना दिसत आहे. अशातच काम आटोपून जळगावहून घरी निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने आलेल्या मालवाहू गाडीने जोरदार धडक दिली. यात मागे बसलेल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वार पती गंभीर जखमी आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव- ममुराबाद रस्त्यावर हा अपघात झाला असून यावल तालुक्यातील सावखेडसिम येथील संजिदा जुम्मा तडवी (वय ४२) असे अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान संजिदा तडवी बचत गटाचे शिबिर असल्याने जळगावी आल्या होत्या. हे शिबीर आटोपल्यानंतर पती जुम्मा तडवी यांच्यासोबत दुचाकीने सावखेडासिम येथे घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. याच वेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने धडक दिली.
जळगाव येथून निघाल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास ममुराबाद रस्त्यावरील प्रजापतनगर जवळ एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेट संजिदा तडवी यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी त्यांचे पती जुम्मा तडवी यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
अपघात घडल्यानंतर रस्त्यावरील वाहन धारकांनी मदतीचा हात दिला. मात्र दुचाकीला धडक देणारे वाहन चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फरार वाहन चालकाचा शोध सुरु असून या प्रकरणी पोलिस नाईक प्रदीप राजपूत तपास करीत आहेत.
Discussion about this post