धुळे । पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्याचपूर्वी धुळ्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाले असून उद्या मुंबई येथे ते अधिकृत प्रवेश करणार आहे. यासाठी आज हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचा चेहरा असलेले तसेच राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले माजी आमदार कुणाल पाटील यांचा १ जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कुणाल पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मुकटी गाव परिसरासह धुळे तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
तसेच कुणाल पाटील यांच्या प्रवेशासाठी आज गेले त्यापेक्षा अधिक पटीने कार्यकर्ते उद्या सकाळी मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या कार्यकर्त्यांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती संचालक तसेच अनेक विद्यमान सरपंच आणि उपसरपंच यांचा समावेश आहे. मुकटी परिसर आणि धुळे तालुक्यातील विविध भागांमधून हे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईकडे निघाले आहेत.
कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात होणारा हा पक्षप्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपला यामुळे धुळे जिल्ह्यात नवसंजीवनी मिळेल, तर काँग्रेस पक्ष जिल्ह्यातून जवळपास संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. या मोठ्या पक्ष प्रवेशामुळे धुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Discussion about this post