मुंबई । पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले. या निर्णयानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत ५ जुलैला विजयी मेळावा होणार असल्याचं सांगितलं. तसेच त्यांनी संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली,
‘काल राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले. किंवा जीआर रद्द करणं त्यांना भाग पडलं. यासाठी मी महाराष्ट्रातील जनतेचा अभिनंदन करतो. खरंतर गरज नसतानाही हा विषय उचलला. जीआर रद्द झाल्यानंतर हा विषय आता संपला. मराठी जनतेसह मी साहित्यिक, काही कलाकार आणि मराठी माध्यमांचे पत्रकार, संपादकांचे मी आभार मानतो’, असं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, शासन निर्णयानंतर मोर्चा रद्द करण्यात आला. रद्द झालेल्या मोर्चाबाबतही राज ठाकरेंनी भाष्य केलंय, ‘हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हापासून आम्ही या निर्णयाविरोधात आहोत. त्यावेळी अनेक नेत्यांनीही पाठिंबा दर्शवला. आम्ही मोर्चाची तारीख ५ जुलै जाहीर केल. जर हा मोर्चा निघाला असता तर, भुतो न भविष्यति असा मोर्चा निघाला असता’, असं राज ठाकरे म्हणाले. हा मोर्चा पाहून ७०-७५ वर्षांच्या लोकांना संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता, त्यामुळे परत सरकार अशा भानगडीत पडणार नाही, अशी आशा मी बाळगतो, असंही राज ठाकरे म्हणाले.
५ तारखेला विजयी मेळावा होणार
राज ठाकरेंनी ५ जुलैला मोर्चा नसून मेळावा निघणार असल्याचं सांगितलं. ‘फडणवीस सरकारने निर्णय घेतल्यानंतर संजय राऊतांनी मला फोन केला . पुढे काय करायचं, असं मला त्यांनी विचारलं. मी त्यांना मोर्चा रद्द करावा लागेल असं म्हटलं. मग विजयी मेळावा घ्यायला पाहिजे. ठिकाण वगैरे आता जाहीर करायला नको, माझ्या सहकाऱ्यांशी बोलेन. ५ जुलैला विजयी मेळावा होईल. या मेळाव्याला पक्षीय लेबल लावण्यात अर्थ नाही, हा खरंतर मराठी माणसाचा विजय आहे,’ असं राज ठाकरे म्हणाले.
Discussion about this post