मुंबई । मागच्या काही दिवसापासून राज्यात पाऊस कोसळत आहे. यंदा जुनमध्येच धोधो पाऊस बरसत आहे. आता जुलैच्या सुरुवातीलाच राज्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात पुढील चार, पाच दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि रायगड आणि पुणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.
राज्यातील काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज सोमवारी कोकण, घाटमाथ्यासह पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे शहरासह जिल्हा आणि घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात ऊन ढगाळ हवामान वारे असे संमिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. मुंबईत सोमवारी सकाळी ढगाळ वातावरण आहे.
विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस
विदर्भात अजूनही पावसाने जोर धरलेला नाही. यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. परंतु पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. नागपूर जिल्ह्यत अजूनही सरासरी पाऊस नाही. यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. किमान शंभर मिमी पावसानंतरच पेरणी करा, असा सल्ला कृषी विभागाने दिला असला तरी काही भागात हलकसा पाऊस झाल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. नागपूर जिल्ह्यात चार लाख 69 हजार 432 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 57 हजार 147 हेक्टर वर पेरणी करण्यात आली आहे.
Discussion about this post