जळगाव । जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरात संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. ज्यात रोजगाराचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून तिचे जबरदस्तीने लग्न लावल्याचा धक्का आणि कोल्हापूर येथील आरोपींकडून जीवे मारण्याच्या धमक्या, यामुळे त्रस्त झालेल्या प्रौढाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना जळगावातील हरीविठ्ठल नगरात आज रविवारी उघडकीस आली असून या आत्महत्येमुळे मुलीच्या अपहरणाचा, विक्रीचा आणि लग्नाचा व गर्भपाताचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
काय आहे प्रकार?
जळगावातील काही महिलांनी रोजगाराचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला नाशिक येथे नेले. त्यानंतर तिला अडीच लाख रुपये रोख आणि दागिने घेऊन कोल्हापूर येथील काही लोकांना विकून टाकले. इतकेच नव्हे तर, या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले आणि या काळात ती ५ महिन्यांची गर्भवती देखील झाली. धक्कादायक म्हणजे, तिचा गर्भपातही करण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या सर्व प्रकाराला कंटाळून अल्पवयीन मुलगी कशीबशी घरी पळून आली आणि तिने आपल्या कुटुंबाला आपबीती सांगितली. हे ऐकून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या गंभीर प्रकरणी कुटुंबीयांनी गेल्या आठ दिवसांपासून रामानंदनगर पोलीस ठाण्यात तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच, मुलीला विकत घेणारे आणि तिच्याशी लग्न करणारे कोल्हापूर येथील आठ ते दहा जण ‘मुलीला परत पाठवा, आमचे पैसे परत द्या’ अशी मागणी करत जीवे मारण्याच्या धमक्या देत होते.
एका बाजूला मुलीसोबत घडलेला अमानुष प्रकार, त्यात आरोपींकडून येणाऱ्या धमक्या आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेतली जात नसल्याने या सर्व त्रासाला कंटाळून मुलीच्या पित्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे. रोजगाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलींची विक्री आणि लग्न लावणे हे मोठे रॅकेट असून, या प्रकरणाचा सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही नातेवाईकांनी केली आहे.
Discussion about this post