विद्यापीठामध्ये ९ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने महाराष्ट्र शासन व विविध उद्योग व्यावसायिक संस्था यांच्या समवेत ९ सामंजस्य करारावर कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या उपस्थितीत दि.27 जून रोजी स्वाक्षरी करण्यात आल्या.तसेच बीकॉम रिटेल मॅनेजमेंट, बीएससी अप्लाइड बायोलॉजी, बीए ह्युमेनिटीज अँड सिव्हिल सर्व्हिसेस या तीन अप्रेटिंसशिप एम्बेडेड डीग्री प्रोग्राम सोबत एम.ए. ट्रायबल ॲकेडमी पी.जी. डिप्लोमा इन मॅनेजमेंट प्रोग्रॅमच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करुन या अभ्यासक्रमाच्या प्रारंभाची घोषणा करण्यात आली. यावेळी या समारंभाचेअध्यक्ष विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष अशोक जैन, प्रमुख अतिथी विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा.डॉ.आर.एस.माळी, प्रा.डॉ.के.बी.पाटील, ॲप्रेंटेशिप ॲम्बडेड डिग्री प्रोग्राम (AEDP) कार्यगट महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे व कुलसचिव डॉ. विनोद पाटील मंचावर उपस्थित होते.
यावेळी कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी सांगितले की, स्थानिक विद्यार्थ्याना रोजगार मिळण्यासाठी अप्रेंटिस एम्बेडेड डिग्री प्रोग्रामच्या माध्यमातून संधी निर्माण झाली आहे. शिकतांनाच त्यांना विद्यावेतनही मिळणार असून इच्छित क्षेत्रात त्यांना काम करण्याची संधी निर्माण होणार आहे. महाराष्ट्र शासन व उद्योग व्यावसायिकांनी भरभरुन प्रतिसाद देऊन सहकार्याबददल आभार मानले.
माजी कुलगुरु प्रा. आर.एस.माळी यांनी उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले पाहिजे त्याकरीता देशात विद्यापीठांची संख्या वाढली पाहिजे. अप्रेंटिस एम्बेडेड डिग्री प्रोग्राम व्दारा राबविले जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांमुळे निश्चितच उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाच्या या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले.
माजी कुलगुरु प्रा. के.बी. पाटील यांनी सांगितले की, विद्यापीठांमधून नाविन्यपूर्ण संशोधन होणे आवश्यक आहे. त्याकरीता पुरेसे नियमित अध्यापक विद्यापीठात असावे. बदलत्या काळाप्रमाणे शिक्षण बदलत चालले आहे. अप्रेंटिस एम्बेडेड डिग्री प्रोग्रामच्या या तीन नविन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना चांगली संधी आहे. विद्यापीठाचे धोरण चांगले असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.भरत अमळकर यांनी सांगितले की, युवकांची संख्या वाढत आहे त्यानुसार वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी नव्या शैक्षणिक धेारण उपयुक्त ठरेल. त्याचाच एक भाग म्हणून अप्रेंटिस एम्बेडेड डिग्री प्रोग्रामच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची निर्मिती होऊन विद्यार्थ्यांना शिकतांनाच विद्यावेतन मिळेल व भविष्यात नोकरीची संधी देखील निर्माण होईल. नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे शिक्षण मिळेल व त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे. कबचौउमविने कमी कालावधीत हे अभ्यासक्रम तयार करुन व त्याची सुरुवात करुन राज्यात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
उद्योजक अनिल कांकरीया यांनी रिटेल क्षेत्रात मोठी संधी आहे मात्र त्याकरीता कुशल मनुष्यबळ मिळत नव्हते. विद्यापीठोन उद्योगांसमवते चर्चा करुन तयार केलेल्या या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षीत मुनष्यबळ प्राप्त होईल असे सांगितले. जळगाव पिपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील यांनी हे अभ्यासक्रम संस्था व विद्यार्थी दोघांनाही फायद्याचे असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करतांना अशोक जैन यांनी सांगितले की, विद्यापीठाने केवळ तीन महिन्यांपूर्वी जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातील उद्योगांसमवेत अप्रेंटिस एम्बेडेड डिग्री प्रोग्राम अंतर्गत अभ्यासक्रमाबाबत संवाद साधला होता आणि आज त्यामधून तीन अभ्यासक्रम तयार करुन त्यांना प्रारंभ होत आहे अत्यंत कमी कालावधीत होत असलेली ही अंमलबजावणी अतिशय कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. तसेच केळी व्यवसायातून कोटयावधी रुपयांच्या माल विदेशात जातो. टिश्यू कल्चर व केळीची शेतीवर आधारित विद्यापीठाने अभ्यासक्रम तयार करता येईल का याबाबतचा प्रस्ताव मांडला. विद्यापीठाने असा अभ्यासक्रम तयार केला तर शेतकरी व विद्यार्थी यांना याचा मोठया प्रमाणावर फायदा होईल. याकरीता जैन उद्योग समुह पूर्ण सहकार्य करेल अशी हमी त्यांनी यावेळी दिली.
प्रारंभी प्रातिनिधीक स्वरुपात करारावर विद्यापीठाकडून कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी व प्रोग्रेसिव ग्रोसर्स (नवजीवन प्लस सुपर शॉप)चे संचालक अनील कांकरीया यांनी स्वाक्षरी केल्या. त्यानंतर करार हस्तांतरण करण्यात आले. करार हस्तांतरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जळगावच्या वतीने उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जळगाव पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक ली. च्यावतीने अध्यक्ष अनिकेत पाटील, जळगाव जनता बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.कडून श्री.भट व डॉ.के.बी.पाटील, नॅचरुली युवर्स बायोटेक तर्फे संचालक निलेश तेली, दीपक मेडिकल अमळनेरचे दीपक पाटील, बोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशीप ट्रेनिंग, मुंबई कडून प्रदीप थेंगडे व बी आय ए एफच्या पूनम पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवसंशोधन, नवोपक्रम व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर यांनी तर आभार कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी मानले.
Discussion about this post