नवी दिल्ली । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता इयत्ता दहावीची वर्षातून दोन वेळा परीक्षा होणार आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांना एका वर्षात दोन संधी मिळतील, त्यामुळे त्यांच्यावर तणाव कमी होण्याची शक्यता आहे.
देशात दरवर्षी लाखो-करोडो विद्यार्थी CBSE बोर्डातून दहावीची परीक्षा देत असतात. यातील काही विद्यार्थी पास होतात, तर काही नापास होतात. नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र, आता २०२६ पासून हा पर्याय राहणार नाही. CBSE बोर्डाने वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
२०२६ पासून दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या नियमांना सीबीएसईने मान्यता दिली, असं परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की, ‘CBSE बोर्डाच्या परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्चमध्ये, तर दुसरा टप्पा मे महिन्यात घेतला जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बसणे अनिवार्य असेल, तर दुसरा टप्पा हा पर्यायी असेल. वर्षातून दोनदा सीबीएसई दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जातील.
Discussion about this post