नवी दिल्ली । रेल्वे बोर्डाने वेटिंग तिकिटांबाबत एक महत्त्वाचा नवा नियम लागू केला आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळी “तिकिट कन्फर्म होणार की नाही?” या अनिश्चिततेतून प्रवाशांची सुटका होणार आहे. नवीन नियमानुसार, ट्रेनच्या क्षमतेच्या 25 टक्के इतकी मर्यादा वेटिंग तिकिटांसाठी निश्चित करण्यात आली आहे. वेटिंग तिकिटांची मर्यादा ठेवल्यामुळे, कन्फर्म तिकिट मिळण्याची शक्यता अधिक असेल आणि प्रवास अधिक नियोजित पद्धतीने करता येईल.
आता तिकीट बुकिंग कसं होणार?
भारतीय रेल्वेच्या नव्या नियमानुसार, AC फर्स्ट क्लास, सेकंड एसी, थर्ड एसी, स्लीपर आणि चेअर कार या सर्व श्रेणींमध्ये आता एकूण जागांच्या कमाल 25 टक्के तिकिटेच वेटिंग लिस्टसाठी ठेवण्यात येणार आहेत. म्हणजे, एखाद्या ट्रेनमध्ये 800 जागा असतील, तर त्यातील फक्त 200 तिकीटांनाच वेटिंगमध्ये टाकता येईल. त्यानंतर त्या श्रेणीतील बुकिंग थांबवण्यात येईल.
आतापर्यंत वेटिंग तिकिटांसंदर्भातील काय होते नियम?
आतापर्यंत वेटिंग तिकिट बुकिंगसाठी रेल्वेच्या विविध झोनमध्ये वेगवेगळे नियम लागू होते. उदाहरणार्थ, सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेमध्ये 40% पर्यंत वेटिंग तिकिटे बुक केली जात होती. काही झोनमध्ये 700 पर्यंत वेटिंग सीट्स ठेवण्यात येत होत्या.
जानेवारी 2013 मध्ये जारी झालेल्या सर्क्युलरनुसार वेटिंग लिस्टची मर्यादा अशी होती:
फर्स्ट एसी – 30 तिकिटे
सेकंड एसी – 100 तिकिटे
थर्ड एसी – 300 तिकिटे
स्लीपर क्लास – 400 तिकिटे
नवीन नियमांमुळे ही असमानता दूर होणार असून सर्व झोनसाठी एकसमान धोरण लागू होणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना अधिक पारदर्शक आणि नियोजित सेवा मिळेल.
Discussion about this post