धुळे : शेतात मशागतीचे काम करत असताना अंगावर वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शिरपूर तालुक्यातील आढे शिवारात घडली. नथ्थू हार्दिक सनेर (वय ६०) असे वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नथ्थू सनेर हे आढे शिवारातील त्यांच्या स्वतःच्या शेतात खरीप हंगामासाठी बैलजोडीच्या सहाय्याने मशागत करत होते. खरीप हंगामासाठी शेतात मशागतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान दुपारनंतर वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. यामुळे अनेक भागात पेरणीच्या कामांना सुरवात देखील झाली आहे.
दरम्यान शेती काम सुरू असतानाच त्यांनी औत थांबवत बाजूच्या बांधावर विश्रांतीसाठी बसले. यावेळी हंड्यातील पाणी पिण्यासाठी बसले होते. तेव्हाच अचानक आकाशात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. त्या दरम्यान जोरदार आवाज होऊन वीज त्यांच्या अंगावर कोसळली. या घटनेत नथ्थू सनेर यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान शनिवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वादळी वारा व विजांचा कडकडाट देखील सुरु झाला होता. काही वेळातच शिरपूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठीच्या तयारीला वेग आला आहे. मात्र पेरणी योग्य असा मॉन्सूनचा पाऊस अद्याप आला नसल्याने पेरणीचे काम खोळंबले आहे.
Discussion about this post