जळगाव । कृषी कर्जमाफीची घोषणा करून महायुतीच्या सरकारने नंतर शेतकऱ्यांना कसे वाऱ्यावर सोडून दिले, हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन काहीसे वैतागले. शेतकरी कर्जमाफीच्या विषयाला बगल देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची यादीच त्यांनी वाचून दाखवली. एवढ्या सर्व योजना असताना केवळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला धरून सरकारला कोंडीत पकडणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जळगावातील जी. एम. फाउंडेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री महाजन यांनी केंद्र सरकारच्या महिला, युवक, शेतकरी, दलित, आदिवासी आणि ओबीसी घटकांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी, मंत्री महाजन यांनी कृषी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली.
महायुतीच्या सरकारने निवडणुकीच्या आधी कृषी कर्जमाफीची घोषणा केली होती.पण सरकारने केलेल्या इतर चांगल्या गोष्टी सोडून एकसारखे कर्जमाफीच्या मागे लागणे योग्य नाही. शासनाकडून विकासाच्या चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. रस्ते, पूल कसे चांगले होत आहेत, त्याकडेही जरा बघा, असा अजब सल्ला भाजप गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
Discussion about this post