जळगाव । जळगाव शहरातील कानळदा रोड परिसरात राहणाऱ्या तरुणीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे. कोमल सोपान शिंदे असं या मुलीचे नाव असून तिची नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.कोमलचे वडील दुचाकीवरून गावागावात जाऊन कपडे विक्री करतात तर आई एका कंपनीत कामगार म्हणून काम करते. मात्र, या कष्टकरी दाम्पत्याच्या लेकीनं प्रतिकूल परिस्थितीत अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केल आहे.
कोमल आई वडील आणि एक लहान भाऊसह जळगाव शहरातील कानळदा रोड परिसरात राहतात. वडील सोपान शिंदे हे दुचाकीवर गावोगावी जाऊन कपडे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. तर कोमलची आई भारती यासुद्धा गेल्या 10 वर्षांपासून जळगावतील जैन इरिगेशन कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करतात. कोमलने दहावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. तर एमएसडब्ल्यू पूर्ण करत तिचं पदव्युत्तर शिक्षणदेखील पूर्ण झालं आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोमलने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची माहिती घेत तयारी सुरू केली. 2019 मध्ये क्लास लावला आणि पहिल्यांदा परीक्षा दिली. मात्र, कोमलला यात अपयश आलं.
2020 मध्ये कोमल हिने पुन्हा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अर्ज भरला. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. 2021 मध्येसुद्धा ही परीक्षा झाली नाही. या परीक्षेसाठी सप्टेंबर महिना आणि 2022 हे साल उजाडलं. नुकत्याच लागलेल्या निकालात कोमल उत्तीर्ण झाली असून ती पोलीस उपनिरीक्षक झाली आहे. कोमलचा गल्लीतील नागरिकांनी मोठा कौतुक सोहळा केला. तिच्या यशाबद्दल रहिवाशांनी तिची घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढली.
आम्ही जे कष्ट केलं, त्या दुपटीने आनंद आमच्या मुलीने दिला असून पीएसआय होवून आमचं स्वप्न पूर्ण केलं आहे. 12-12 तास अभ्यास करायची, मला कामातही मदत करत होती. व्हॉटस्ॲप असो की मोबाईल त्यापासून ती लांब होती. इतर हौसमौज करणाऱ्या मुलींना बघून माझ्या मुलीने कशाचाही हट्ट केला नाही. त्याचं मला खूप दु:ख व्हायचं, मुलगी पीएसआय झाल्याचा मोठा आनंद असल्याचे कोमल हिची आई भारती शिंदे यांनी बोलताना सांगितलं.
तर कुटुंबाची परिस्थिती नाजूक होती, आम्ही शिकलो नाही, मुलांनी शिकावं म्हणून आमची इच्छा होती, त्यानुसार मुलगी शिकली आणि पीएसआय झाली, आज मी खेड्यावर कपडे विकायला जातो, तेव्हा लोक पीएसआयचे वडील म्हणून जेव्हा हाक मारतात तेव्हा मोठा आनंद होतो. आमचे कष्ट फळाला आल्याचेही कोमल हिचे वडील सोपान शिंदे हे सांगतात.