मुंबई । यंदा महाराष्ट्रात मान्सून १३ ते १४ दिवस आधीच दाखल झाला आहे. मान्सून राज्यात 25 मे रोजी दाखल झाला. तर 26 रोजी त्याने मुंबई, पुणे काबीज करीत सोलापूरपर्यंत मजल मारली. अवघ्या दोन दिवसांत तो संपूर्ण राज्य व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान राज्यात सध्या कोकण, पुणे घाटमाथा आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट आणि उर्वरित राज्यासाठी येलो अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. तेलंगणा, छत्तीसगड ते आंध्रप्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे, तर बंगालच्या उपसागरात आज (ता. २७) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.
आज या जिल्ह्यांना अलर्ट
रेड अलर्ट : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाटमाथा. ऑरेंज अलर्ट : रायगड, पुणे घाटमाथा, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड. येलो अलर्ट : ठाणे, मुंबई, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, गडचिरोली, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर
Discussion about this post