अमळनेर । धुळे येथील अवधान एमआयडीसी तलावात पडलेल्या मित्राला वाचविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या मित्राचा गाळात बुडल्याने मृत्यू झाला.इन्साफ खान असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून काही दिवसांपूर्वी त्याचा विवाह निश्चित झाला होता.
इन्साफ खान हा १९ मे रोजी मित्र मयूर गांगुर्डे याच्यासोबत धुळे येथील अवधान एमआयडीसी तलावाकडे फिरायला गेला होता. तलावाकाठी फिरत असताना अचानक मयूरचा पाय घसरला आणि मयूर पाण्यात बुडू लागला. क्षणाचाही विलंब न करता इन्साफने पाण्यात उडी मारली. त्याने मयूरला पाण्यातून बाहेर काढले.
मित्राला बाहेर काढल्यानंतर इन्साफ मात्र गाळात अडकला. त्याला यातून बाहेर निघता येत नसल्याने बाहेर येण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू झाला मात्र तो गाळात बुडाला. याच वेळी परिसरात असलेल्या काही नागरिकांनी तलावात उडी मारत इन्साफला बाहेर काढले. परंतु त्याच्या नाकातोंडात गाळ गेल्याने त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय हिरे महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात पाठविले.
यानंतर इन्साफला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र २० मे रोजी सकाळी इन्साफचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत मोहाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. इन्साफ हा मूळचा राजस्थान येथील होता. अमळनेरला भाड्याने घर घेऊन आई- वडिलांसह वास्तव्याला होता. काही दिवसांपूर्वी त्याचा विवाह निश्चित झाला होता.
Discussion about this post