जळगाव । राज्यात अधिकृतरित्या मान्सूनचे आगमन झाले नसले तरी गेल्या काही दिवसांपासून विविध भागात पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे उन्हाळी पीक आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुढील आठवडाभर पावसाची अशीच परिस्थिती राज्यात राहणार असल्याचा अंदाजहवामान खात्याने वर्तविला आहे. कारण आता राज्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले असून राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला असून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
नैऋत्य मौसमी वारे (मान्सून) पुढे सरकरण्यासाठी अनुकुल वातावरण असून, सध्या अंदमान व निकोबार बेटे, समुद्र परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पुढील दहा ते बारा दिवसात मान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मात्र, तत्पूर्वी राज्यातील कोकाण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पूर्व मौसमी पावसाने धुमाकूळ घातला आहे.
या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट
चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये प्रचंड विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Discussion about this post