दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात अनेक विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मात्र काही विद्यार्थ्यांना अपयश आले आहे. आता दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बोर्डाकडून पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. आता नापास झालेले विद्यार्थी ही परीक्षा देऊन अकरावीला प्रवेश घेऊ शकतात. या परीक्षेची तारीख जाणून घेऊयात.
कधी होणार परीक्षा?
दहावीच्या परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 24 जून ते 17 जुलै दरम्यान पुरवणी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. 86 हजार 641 विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी पात्र आहेत. तर 34 हजार 393 विद्यार्थी एटीकेटीसाठी पात्र असल्याची माहिती समोर आली आहे. ही परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांमध्ये निकाल जाहीर होणार आहे, त्यामुळे यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेता येणार आहे.
एसएससी बोर्डाकडून पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु केली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फी भरावी लागणार आहे. सर्व विषयांची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त फी भरावी लागणार आहे, तर एक किंवा दोन विषयांनी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी फी भरावी लागणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती बोर्डाकडून लवकरच दिली जाणार आहे.
Discussion about this post