जळगाव । उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचे (मान्सून) आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. दरम्यान सध्या मान्सून अंदमानात पोहोचला असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली. तर केरळ किनारपट्टीवर 27 मे 2025 रोजी मान्सून दाखल होणार असून महाराष्ट्रात 6 जून रोजी मान्सून प्रवेश करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सामान्यतः मान्सून 1 जूनपर्यंत केरळमध्ये आणि 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशात पसरतो. मात्र, यंदा अनुकूल हवामान परिस्थितीमुळे मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसालासुरुवात झाली आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. शिकमध्ये गेल्या पाच-सहा दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे, तर बीड आणि जालना येथेही बेमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यात सोमवारी संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. आज उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसा ताशी 50-60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
पुढील 5 दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने अंदाजानुसार, पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञ के एस होसळीकर यांनी राज्यात पुढील 4-5 दिवस वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जनेसह, वादळी वारे आणि पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. तसेच दररोज नागरिकांनी सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन देखील केले आहे. पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील बहुतांश भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंतर्गत महाराष्ट्रात धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, संभाजीनगर, लातूर, अकोला, अमरावती आणि इतर जिल्ह्यांमध्ये धुळीचे वादळ, विजांचा कडकडाट आणि पावसाचा इशारा दिला आहे. या भागात नागरिकांना सावध राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Discussion about this post