जळगाव: पाचोरा शहरातील गोविंद नगर भागात एका १९ वर्षीय नवविवाहित तरुणीने घराजवळ असलेल्या विहिरीत उडी घेवून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली. अवघ्या तीन महिन्यापूर्वीच लग्न झालं होते. काजल राहुल चव्हाण असं आत्महत्या केलेल्या नववधूचे नाव आहे. याघटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून विवाहितेस सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास होत असल्यानेच विवाहितेने आत्महत्या केली असल्याचा आरोप काजलच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. त्यानुसार, पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवाशी राहुल चव्हाण याचा तीन महिन्यांपूर्वी जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथील काजल राठोड हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. सासरी सतत होणाऱ्या भांडणामुळे राहुल चव्हाण हा १० जुलै रोजी काजल सोबत पाचोरा येथील गोविंद नगर भागात भाड्याची खोली घेऊन राहायला आला होता.
दरम्यान, १३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास काजल घरात दिसून आली नाही. तिचा शोध घेतला असता तिने घराजवळ असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने काजलला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी काजलला मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात काजलच्या आईसह माहेरच्या मंडळींनी एकच आक्रोश केला.
लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक दिली. त्यानंतर काजलला सासु सुग्राबाई चव्हाण, मुक्ताबाई चव्हाण, चुलत सासु पार्वतीबाई चव्हाण या किरकोळ कारणावरून टोचून बोलत असल्याने त्यांच्यात वाद होत होते. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळूनच काजलने आत्महत्या केल्याचा आरोप काजलच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. त्यानुसार, त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
Discussion about this post