पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारीवी परीक्षेच्या निकालाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.राज्यातील सर्वच शिक्षकांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका वेळेत तपासून पूर्ण केल्या आहेत. आता निकाल छपाई सुरू झाली असून १३ मे रोजी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल. तर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल १५ किंवा १६ मे रोजी जाहीर होईल, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
यंदा पहिल्यांदाच इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दरवर्षीपेक्षा १० दिवस अगोदर सुरू झाली होती. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च य काळात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात बोर्डाने घेतली. परीक्षेनंतर बोर्डाने ठरवून दिलेल्या निश्चित वेळेत सर्व शिक्षकांनी उत्तरपत्रिकांची तपासणी केली. आता उत्तरपत्रिकांमध्ये कोणता प्रश्न तपासायचा राहिला आहे का?, उत्तरपत्रिकेवरील गुण आणि गुणपत्रिकेवर घेतलेले गुण बरोबर आहेत का?, याची पडताळणी युद्धपातळीवर सुरू आहे.
चालू आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन गुणपत्रिकांची छपाई सुरू होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. बोर्डाचा निकाल ११ मेपर्यंत पूर्ण होईल, त्यानंतर १३ किंवा १४ मे रोजी बारावीचा तर दहावीचा निकाल १६ मेपूर्वी जाहीर होईल. विद्यार्थ्यांना घरबसल्या निकाल पाहता येणार असून त्यासंदर्भातील वेबसाइट पुढील आठवड्यात बोर्डाकडून दिल्या जाणार आहेत. निकालानंतर त्यांना पुढील प्रवेशाचे अचूक नियोजन करणे सोयीचे होणार आहे.
Discussion about this post