जळगाव : जळगाव प्रादेशिक परिवहन विभागात बनावट व्यवसाय करपावती सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एक अनधिकृत एजंट आणि वाहन मालकाविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरटीओ कार्यालयातील कर वसुली अधिकारी चंद्रशेखर शंकरराव इंगळे हे परवाना विभागात कार्यरत असताना बुधवार (दि.23) रोजी सायंकाळी 4 ते 5 च्या दरम्यान सुलतान बेग नजीर बेग मिर्झा (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) हे शाकीब रहब शेख (रा. जारगाव चौफुली, ता. पाचोरा) यांच्या मालकीच्या MH-18-BA-0221 या क्रमांकाच्या वाहनाचा राष्ट्रीय परवाना रद्द करण्यासाठी अर्ज व कागदपत्रांसह आले होते.
सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये 2023-24 आणि 2024-25 या कालावधीतील व्यवसाय कर पावत्या जोडलेल्या होत्या. मात्र, त्यातील दोन पावत्या बनावट असल्याचा संशय इंगळे यांना आला. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय कर विभागाशी संपर्क साधून या पावत्यांची पडताळणी केली.
गुरुवार (दि.24) रोजी प्राप्त झालेल्या व्यवसाय कर विभागाच्या अधिकृत पत्रानुसार, वरील वाहनासाठी 2024 – 25 या वर्षाचा कर भरणा झालेला नसल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, बनावट पावत्या सादर करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी चंद्रशेखर इंगळे यांनी अनधिकृत एजंट सुलतान बेग, नजीर बेग, मिर्झा आणि वाहन मालक शाकीब रहब शेख यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Discussion about this post