मुंबई । शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा तिढा सुटत नसून तशातच प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूदेखील बरेच दिवसापासून मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले होते. पण आता त्यांनी मंत्रिपदावर सध्या तरी दावा सांगणार नसले तरी सरकारमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले. बच्चू कडू हे सत्तेत राहणार की आपली वेगळी भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार त्यांनी नुकताच पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘मी आजच मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो, पण मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला आणि ते अर्ध्या तासापासून मला मनवत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर तूर्तास मी मंत्रीपदाचा दावा पुढे ढकलला आहे.’, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘एकंदरीत सत्ता, पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे. सर्व काही पदासाठी नसतं. काही लोकं कमेंट्स करतात की तुम्हाला आता पद मिळणार नाही. ५० खोके वगैरे. काही लोकांकडून चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मी त्याची पर्वा करत नाही.’
‘मुख्यमंत्र्यांच्या विनंतीमुळे आजचा मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय मी पुढे ढकलला आहे. मुख्यमंत्र्यांची विनंती म्हणून मी १८ तारखेपर्यंत पुढे ढकलला आहे. १७ तारखेचा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर १८ तारखेला मी ठाम राहणार आहे. १८ तारखेला माझा निर्णय मी जाहीर करणार आहे. मंत्रिपदाचा हव्यास बच्चू कडूनला कधी नव्हता आणि नसणार आहे.’ , असे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.
Discussion about this post