जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यांनतर भारताने पाकिस्तानाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला असून त्यातच भारताकडून युध्दाची तयारी केली जात असल्याची भीती पाकिस्तानला आहे. अशातच पाकिस्तानी लष्करात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आलीय. मागील काही दिवसांत शेकडो जणांनी राजीनामा दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानी सैन्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकाचवेळी तब्बल 250 लष्करी अधिकारी आणि सुमारे 1200 सैनिकांनी सामुहिक राजीनामा दिल्याची माहिती आहे. त्यामुळे पाक लष्करावरील संकट अधिक गडद होऊ लागले आहे. पाकिस्तानी सैन्यामध्ये असंतोष आणि मानसिक दबाव वाढल्याचे वातावरण आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेची सुरक्षा सांभाळणाऱ्या 11 व्या तुकडीचे कमांडर लेफ्टनंट जनरल उमर अहमद बुकारी यांनी लष्कर प्रमुखांना लिहिलेल्या पत्रामध्ये गंभीर चिंता व्यक्त केली आहे. राजीनामासत्राची कारणेही समोर आली आहे. लष्करी अधिकाऱ्यांचे सातत्याने बदलणार आदेश, मानसिक थकवा आणि कुटुंबावरील वाढत्या दबावामुळे सैनिकांकडून राजीनामा दिला जात आहे. त्याचा थेट परिणाम सीमेवर जाणवू लागला आहे. सीमेवर सैन्याची कमतरता जाणवत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
लेफ्टनंट जनरल बुखारी यांनी या गंभीर स्थितीची माहिती लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना दिली आहे. त्यानंतर मुख्यालयाने आदेश जारी करत राजीनामे न स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे. सैन्य नियमांचे हे उल्लंघन असल्याचे मुख्यालयाने म्हटले आहे. तसेच राजीनामे देणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
Discussion about this post