नंदुरबार : जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावात पहाटेच्या सुमारास दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे. सकाळी सकाळी तयारी करून कामावर जाण्याची तयारी सुरु असताना याचवेळी काळाने झडप घातली. भरधाव ट्रकने घराला जोरदार धडक दिल्याने त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.अपघातानंतर सदर ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप दिसून येत आहे.
शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ G वर हा अपघात झाला. संजय ठाकरे यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर जनाबाई ठाकरे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना गावातील नागरिकांनी लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
दरम्यान ठाकरे यांचे महामार्गाला लागूनच घर आहे. दरम्यान सकाळी घरात कामाची लगबग सुरु असताना होत्याचे नव्हते झाले. महामार्गावरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने घराला जोरदार धडक दिली. या धडकेत संजय ठाकरे जागीच ठार झाले आहेत. तर जनाबाई ठाकरे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भयानक होता की अपघातात घराच्या भिंतीही कोसळल्या आहेत. तसेच बाहेर उभ्या असलेल्या दुचाकी आणि मालवाहू गाडीचे देखील यात नुकसान झाले आहे.
Discussion about this post