अपघाताची एक भीषण घटना दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर घडलीय. ज्यात एका भरधाव पिकअप वाहनाने ११ स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले. या अपघातात ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर आरोपी चालकाने पळ काढला असून, त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नूह पोलीस ठाण्याच्या फिरोजपूर झिरका सीमेवरील इब्राहिमवास गावाजवळ शनीवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर एका पिकअप वाहनाने ११ स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले. नंतर चालक तेथून फरार झाला. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर, एकाचा रूग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
तर, ४ जणांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून, मृतांमध्ये ६ महिलांचा समावेश आहे.टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महामार्गावर मृतांचे तुकडे विखूरलेले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. अपघातस्थळी पोलीस, रूग्णवाहिका आणि रस्ता सुरक्षा एजन्सीचे पथक दाखल झाले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, ४ जखमी स्वच्छता कर्मचाऱ्यांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर चालक फरार झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेल्या व्हिडिओतून फरार चालकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. अपघातामागील नेमकं कारण काय? याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Discussion about this post