“घरघर रक्तदाता, हर घर रक्तदाता”चा निर्धार; १ मेपासून सदस्य नोंदणी सुरू
जळगाव –जिल्ह्यातील रक्तदात्यांना संघटित करून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळवून देण्याच्या पवित्र उद्देशाने जळगाव जिल्हा रक्तदाता असोसिएशन या संस्थेची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून संस्थेची नोंदणी प्रमाणित झाली असून, रक्तदान क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी संस्था सज्ज झाली आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी दिली.
“घरघर रक्तदाता, हर घर रक्तदाता” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबात किमान एक रक्तदाता तयार करण्याचे ध्येय ठेवून, विविध उपक्रम, जनजागृती मोहिमा, शाळा-कोलेजांमध्ये मार्गदर्शन, तसेच सामाजिक संस्था व डॉक्टर्सच्या सहकार्याने विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
असोसिएशनचे मुख्य उपक्रम:
डिजिटल यंत्रणा: रक्तदात्यांची माहिती संकलित करण्यासाठी मोबाईल अॅप, व्हॉट्सअॅप गट व वेबसाइट तयार केली जाणार.
24×7 रक्त हेल्पलाइन: आपत्कालीन गरजेसाठी रात्रंदिवस कार्यरत सेवा सुरू होणार.
रक्तमित्र बँक: सक्रिय रक्तदात्यांचा डेटा संकलित करून तातडीच्या गरजेसाठी त्वरित मदत मिळवून देणार.
“रक्तमित्र पुरस्कार”: नियमित व आपत्कालीन रक्तदात्यांना दरवर्षी गौरवण्यात येणार.
जनजागृती उपक्रम: शाळा, महाविद्यालये व औद्योगिक संस्थांमध्ये व्याख्याने, कार्यशाळा व रक्तदान शिबिरे आयोजित होणार.
सदस्य नोंदणी:
दिनांक १ मे २०२५ पासून असोसिएशनचे सभासदत्व खुले होणार असून, वर्षातून किमान एकदा रक्तदान करणाऱ्या इच्छुक रक्तदात्यांनाच सदस्यत्व दिले जाईल. रक्तदान ही सर्वोच्च मानवसेवा असल्याने, अपघातग्रस्त, शस्त्रक्रियाग्रस्त, कर्करोगग्रस्त, थॅलेसेमिया व हिमोग्लोबिनच्या कमतरतेने त्रस्त रुग्णांसाठी वेळेत रक्त उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. माणसामाणसातील संवेदनशीलता व संघटनाची गरज यामुळे अधोरेखित होते.संस्थेच्या वतीने लवकरच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून कार्याचा औपचारिक शुभारंभ करण्यात येणार आहे.
विश्वस्त मंडळ:
अध्यक्ष: रक्तमित्र ॲड. जमील देशपांडे, उपाध्यक्ष: रक्तमित्र किरण तळले, सचिव: रक्तमित्र ललित शर्मा, सह सचिव: रक्तमित्र सतीश सैंदाणे, खजिनदार: रक्तमित्र श्रीकृष्ण मंगळे, विश्वस्त: रक्तमित्र संदीप मांडोळे, महेंद्र सपकाळे, चेतन पवार, अविनाश पाटील, जितेंद्र पाटील, विक्रम कापडणे, राजेंद्र मिस्त्री, साजन पाटील. संस्थेच्या या प्रयत्नांमुळे जळगाव जिल्ह्यात रक्ताच्या गरजेची पूर्तता शिस्तबद्ध, विश्वासार्ह व तात्काळ होईल, असा विश्वास संस्थापकांनी व्यक्त केला आहे.
Discussion about this post