जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून उन्हाच्या तडाखा वाढला असून यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. सकाळपासूनच उन्हाचे असह्य चटके लागले असून जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४३.५ अंशांवर गेला आहे. दरम्यान जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून तापमान ४५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. मराठवाडा, विदर्भसह उत्तर महाराष्ट्रातील शहरातील तापमान ४२ अंशाच्या पार गेले आहे. यात जळगाव जिल्ह्यात आगामी तीन ते चार दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील तापमान ४२ अंशाच्या वर पोहचले असून आगामी काही दिवसात हे तापमान ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
सावधानतेचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २५ एप्रिलला अतिउष्ण, दमट तापमान राहणार आहे. यात जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव, परभणी, नांदेड, हिंगोली, सोलापूर, लातूर आदी जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ उष्ण लाट राहणार असून, जिल्हा प्रशासनाने सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे.
Discussion about this post