जळगाव । जळगाव एमआयडीसी पोलीसांनी अजिंठा चौकातून छत्रपती संभाजीनगर मधील बुलेट चोराला अटक केली आहे. त्याच्याजवळील चोरीच्या दोन बुलेट जप्त करण्यात आली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.,
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकातील पोउपनि चंद्रकांत धनके, पोहेका गणेश शिरसाळे, पोका गणेश ठाकरे, राहुल रगडे, विशाल कोळी, योगेश बारी यांच्या पथकाने अजिंठा चौफुली येथे सापळा रचला.
या पथकाला लाल रंगाची विना नंबर प्लेटची बुलेट घेऊन उभा असलेला एक तरुण संशयास्पद अवस्थेत दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्याने साजीद खान असे सांगितले. बुलेटच्या कागदपत्रांची मागणी केली असता, त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र नव्हते. पोलिसांनी तात्काळ बुलेटच्या चेसीस नंबरची ऑनलाइन तपासणी केली असता, ती बुलेट पुणे येथील असल्याचे निष्पन्न झाले.
यामुळे साजीद खान याला एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरीच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून अडीच लाख रूपये किंमतीच्या दोन बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे. तपासात या दोन्ही बुलेट पुणे शहरातील चंदननगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली असून, आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका गणेश शिरसाळे करत आहेत.
Discussion about this post