मुंबई । उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? हा सवाल गेल्या दशकभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात विचारला जातोय. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव में Truth’ या व्हिडिओ पॉडकॉस्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत मोठं वक्तव्य केला आहे.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना युतीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्यामध्ये काहीच चुकीचे नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंना राज ठाकरे यांनी युतीचा प्रस्ताव पाठवला आहे. आमच्यातील वाद, भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे, त्यासाठी एकत्र यायला हरकत नाही, असे राज ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटले आहे. यावर उद्धव ठाकरेंकडून काय प्रतिक्रिया येतेय, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
शिवसेना फुटली किंवा नाही फुटली, तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना राज ठाकरेंनी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राज ठाकरे म्हणाले, “विषय फक्त इच्छेचा आहे. माझ्या स्वार्थाचा विषय नाही. कुठल्याही गोष्टीसाठी आमच्यातले वाद भांडणं किरकोळ आहेत, महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी बाकी सगळ्या गोष्टी शुल्लक आहेत. आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे, एकत्र येणं आणि एकत्र राहणं फार कठीण आहे, असं मला वाटत नाही. माझ्या इच्छेचा आणि स्वार्थाचा प्रश्न नाही.”
Discussion about this post