जळगाव । जळगाव जिल्ह्यात चोपडा बस स्थानकावर एका शेतकऱ्याचे ३५ हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चार चोरट्यांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना अटक केली. विशेष त्यात एका सराईत गुन्हेगारासह चक्क ऑनड्युटी असलेल्या जालनाच्या पोलीस उपनिरीक्षकाचाही सहभाग असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने पोलिस ही चक्राऊन गेले आहेत.
प्रल्हाद पिरोजी मान्टे (वय ५७) असं या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून राज्यभरातील बसस्थानकावर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, प्रल्हाद मान्टे याने चोरी केल्याची कबुली दिली.
बस स्थानकावर ड्यूटी करताना प्रवाशांच्या सुरक्षेच्याबाबत त्रुटी हेरून प्रल्हाद मानटे याने चोरीच्या युक्त्या तयार केल्या,आणि काही चोरांना हाताशी धरून त्याने राज्यातील विविध बस स्थानकावर चोरीचा फंडा अनेक वर्षपासून सुरू ठेवल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
ही घटना अशी की, बुधवारी चोपडा बसस्थानकावर दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास वाळकी गावचे शेतकरी वसंत उखा कोळी यांचे ३५ हजार रूपये बसस्थानकातून चोरी झाले. पोलिसांना चोपड्यात चोरी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पाळत ठेवून चोरांनी वापरलेल्या इंडिगो कार (क्र एम एच-४३ एन-२९२८ व) या कारचा पाठलाग केला.
चोपडा-धरणगाव रस्त्यावर त्यांनी कारसह चोरांना अटक केली. त्यात जालना येथील उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मान्टे, श्रीकांत भिमराव बघे (वय-२७ रा. गोपालनगर खामगाव) अंबादास सुखदेव साळगावकर (४३ रा. माना तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला, रउफ अहमद शेख (४८रा महाळस तालुका जिल्हा बीड) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी व स्थानिक चोपडा शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. यातील अंबादास साळगावकर या आरोपीवर महाराष्ट्रभरात तब्बल २७ गुन्हे दाखल आहेत. तर श्रीकांत बघे याच्यावर शेगाव येथे गुन्हा दाखल आहे.
या घटनेच्या संदर्भात चोपडा शहर पोलिसात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चारचाकी गाडीसह,चार संशयित चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रल्हाद मानटेसह त्याच्या टोळीने किती ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत,याचा शोध घेण्याचे पोलिसांच्या समोर मोठे आव्हान आहे.
Discussion about this post