जळगाव : राज्यातील अनेक भागात दोन आठवड्यांपूर्वी अवकाळी पावसाने झोडपले होते. वादळी वाऱ्यासह गारपीट व जोरदार पाऊस झाल्यानंतर साधारण आठवडाभर तापमानात प्रचंड वाढ झाल्याचे पाहण्यास मिळाले. मात्र आता राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग दाटून आले असून हवामान खात्याने काही ठिकाणी गारपिटीसह पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस होत आहे. यात जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीसह पाऊस झाला आहे. शनिवारी रावेर तालुक्यात झालेल्या गारपिटीनंतर आज दुपारी चोपडा तालुक्यातील अनेक भागात गारपिटीसह जोरदार पावसाला सुरवात झाली. यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
हवामान विभागाकडून पुन्हा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार नांदेड, जळगाव जिल्ह्यातील काही भागात पाऊस होत आहे. जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट झाली आहे.
चोपडा तालुक्याला झोडपले
दरम्यान आज सकाळी कडक उन्हाचे चटके जाणवत असताना आज दुपारच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. तर चोपडा तालुक्यातील अडावद, धानोरा शिवारात गारपीट देखील झाली आहे. या गारपिटीमुळे शेतातील रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
Discussion about this post