जळगाव : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घातला जात असून असाच एक प्रकार जळगावमधून समोर आलाय. यात महिलेच्या मुलीला डायरेक्ट तहसीलदार बनविण्याचे आमिष देण्यात आले होते. या आमिषाला बळी पडत महिलेची तब्बल साडे दहा लाख रुपयात फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एका महिलेला तिच्या मुलीला तहसीलदार बनवायचे होते. यातच महिलेची ज्योती अशोक साळुंखे या महिलेशी ओळख झाली होती. त्यानुसार ज्योती साळुंकेने महिलेला विश्वासात घेत तुमच्या मुलीला तहसीलदार बनवून देते’ असे सांगत विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरून घेतले. तसेच, यासाठी लागणाऱ्या रक्कमेची मागणी करत महिलेकडून वेळोवेळी रोकड स्वरूपात रक्कम घेतली.
मुलीला तहसीलदार बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिलेने सव्वा चार लाख रुपये रोख तसेच तीन लाख रुपये किंमतीचे दागिने दिले. याशिवाय टप्प्याटप्प्याने आणखी काही रक्कम दिली आहे. अशा प्रकारे एकूण १० लाख ५३ हजार ९५० रुपयांत महिलेची फसवणूक झाल्याचा समोर आले आहे. तसेच तक्रारदार महिलेच्या माध्यमातून इतरांचे वेगवेगळ्या शासकीय योजनेचे लाभाचे अर्ज भरून घेत त्यासाठी लोकांकडून गोळा केलेले साडे तीन लाख सुद्धा लूट केल्याचे समोर आले आहे.
पोलिसात गुन्हा दाखल
फसवणूक झाल्याचा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला आहे. बरेच दिवस होऊन देखील काम होत नाही. तसेच दिलेल्या पैशांची मागणी केल्यानंतर देखील ते मिळाले नाहीत. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात ज्योती पाटीलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
Discussion about this post