मुंबई । राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची निवडणूक आयोगाने मान्यता रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली असून राज ठाकरे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. ही याचिका मुंबईतील रहिवासी आणि महाराष्ट्रात नोंदणीकृत राजकीय पक्ष उत्तर भारतीय विकास सेनाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी दाखल केली आहे.
महाराष्ट्रात मराठी भाषा न बोलणाऱ्या उत्तर भारतीयांविरुद्ध कथित द्वेषपूर्ण भाषण, लक्ष्यित हिंसाचार आणि धमक्यांसंबंधी अनेक प्रकरणांमध्ये कारवाईची मागणी करणारी याचिका मनसेविरोधात दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.
ॲड. श्रीराम परक्कट यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत सुनील शुक्ला आणि इतर हिंदी भाषिक लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणाचे अनेक खटले दाखल असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासोबतच, मनसेची मान्यता रद्द करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार, सुनील शुक्ला यांना गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात त्यांच्या राजकीय ओळखीमुळे आणि उत्तर भारतीय हक्कांच्या वकिलीमुळे अनेक गंभीर धमक्या आणि छळ तसेच शारीरिक धमक्यांचा सामना करावा लागला आहे. या धमक्या आता सार्वजनिक हिंसाचार आणि शारीरिक हल्ल्यांपर्यंत वाढल्या आहेत, असा आरोपही याचिकाकर्त्याने केला आहे.
काय म्हणाले सुनील शुक्ला ?
राजसाहेब ठाकरे तुम्ही हिंदू्ंना मारायचा आदेश दिला आहे, असं वाटतं. तुम्ही केवळ उत्तर भारतीयांचे नव्हे तर मराठी लोकांचेही विरोधत आहात. मम्हणून मी तुमच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊन याचिका दाखल केली आहे. तुम्ही संविधानाचे उल्लंघन करू शकत नाही. हिंदूंना तुम्ही मारू शकत नाही, असे शुक्ला यांनी म्हटलं आहे. आम्ही तुमचा विरोध करतो, निंदा करतो आणि सुप्रीम कोर्टातून तुमच्या विरुद्द आदेश आणणारच असा इशारा त्यांनी दिला
Discussion about this post