सांगली । राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा एक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुरेश पाटील असं या नेत्याचं नाव असून ते सांगलीचे माजी महापौर आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून विश्रामबाग पोलीस तपास करत आहेत.
सुरेश पाटील यांचे गेल्या 3 दशकांहून सांगलीच्या राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात मोठे नाव आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जाते. 2008 मध्ये जयंत पाटील यांनी महाआघाडीची मोट बांधत सांगली महानगरपालिकेत काँग्रेसचा पराभव करत सत्तांतर घडविले होते. त्यात सुरेश पाटील आघाडीवर होते. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडूनच विधानसभेची निवडणूकही लढवली होती.
गतवर्षी जानेवारी महिन्यात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश केला होता. पण तेव्हापासून ते काही कारणांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून अलिप्त होते. पण त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेल्या सुरश्री संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला त्यांनी गेल्या रविवारी उपस्थिती लावली होती.
मात्र सोमवारी सकाळी त्यांनी निवासस्थानी साडीने गळफास लावण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांना तातडीने ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. रात्री उशिरा रुग्णालय व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत.
Discussion about this post