मुंबई । एप्रिल महिना सुरू होताच राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यादरम्यान ढगाळ वातावरणामुळे तापमानही घसरले होते. मात्र उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरुवात झाल्यामुळे राज्यात तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, सोलापूरसह विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि परभणीने तापमानाची चाळिशी ओलांडली आहे.
राज्यात अकोला येथे ४३.२ अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
विदर्भातील तापमान येत्या दोन तीन दिवसात ४४ अंश सेल्सिअसच्यावर जाणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. विदर्भात सध्या सामान्य तापामानापेक्षा तीन अंश सेल्सिअस जास्त तापमान आहे. विदर्भातील अनेक शहरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.
उद्या आणि परवा विदर्भातील अकोला, यवतमाळ, नागपूरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तापमानात वाढ झाल्याने उष्माघाताचा धोका असल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय.
पुन्हा अवकाळीचे ढग
१० एप्रिलदरम्यान देशातील वातावरण पुन्हा बदल होऊन अवकाळीचे ढग दाटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विजांचा कडकडाट, साेसायट्याचा वारा व वादळी हवामानासह हलका पाऊसही हाेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.
Discussion about this post