जळगाव । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोघेही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच एका पत्रकाराच्या व्हायरल क्लिपचा धागा पकडत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केलेत. गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या आरोपांचं खंडन करत जोरदार पलटवार देखील केला आहे. “कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही. त्यांची अवस्था किती वाईट आहे हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे मी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेवर देखील एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केलं आहे. महाजनांवरचा हा आरोप मी केला नसून गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी केला असल्याचं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिलं आहे.
“हा आरोप गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी केला आहे. अमित शाहांच्या सीडीआरचा उल्लेख करत हा आरोप केला आहे. त्यामुळे उगाचच गिरीश महाजनांनी माझे नाव घेऊन आदळआपट करण्याची आवश्यक नाही. त्यांनी अनिल थत्तेंकडे पुरावे मागावेत. अनिल थत्तेंच्या वक्तव्याचा धागा पकडून मी बोललो. यामागचं सत्य काय आहे ते सांगा अन्यथा अनिल थत्तेंवर कारवाई करा”, असं एकनाथ खडसे यांनी म्हंटल आहे. यावर आता गिरीश महाजन काही उत्तर देतात का? हे पाहावं लागणार आहे.
Discussion about this post